अवघे पुणे ‘क्वारंटाइन

'करोना' विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र जमण्यावर अधिकाधिक बंधने आणण्यात येत आहेत. व्यापाऱ्यांपाठोपाठ शहरातील हॉटेल, बार-रेस्टॉरंटही तीन दिवस बंद करण्याचा निर्णय हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने मंगळवारी घेतला.

नागरिकांची वर्दळ रोखण्यासाठी शहरातील पीएमपी आणि एसटी बसची संख्याही आजपासून कमी करण्यात येणार आहे; तसेच प्रगती एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या २३ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळल्याने सदैव गजबजलेले शहरातील रस्ते मंगळवारी ओस पडले आणि पुणेकरांनाही जणू 'क्वारंटाइन' होत 'करोना'चा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही दिली.

'करोना'चा फैलाव रोखण्यासाठी सरकारने कडक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. नागरिकांनी एकत्र येणे टाळणे, हाच यावरील प्रतिबंधक मार्ग असल्याने व्यापारी महासंघाने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ शहरातील सर्व रेस्टॉरंट आणि बार पुढील तीन दिवस स्वेच्छेने बंद ठेवण्याचा निर्णय पुणे रेस्टॉरन्ट्स अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या सदस्यांनी घेतला. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेऊन, तीन दिवस रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन दिले.